नवी दिल्ली - उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निसर्ग महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असल्याचे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मंगळवारी सांगितले आहे. येत्या 12 तासांत ते अधिक वेगवान आणि तीव्र होणार असून 3 जूनला ते मुंबईजवळ भूभागावर पोहोचण्याची शक्यताही आयएमडीने वर्तविली आहे.
“पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अक्षवृत्त 14.4 अंश (उत्तर) आणि रेखावृत्त 71.2 अंश (दक्षिण) यांच्याजवळ पणजीच्या 300 किलोमीटर पश्चिम-नैऋत्येला आणि मुंबईच्या 550 किलोमीटर दक्षिण-नैऋत्येला आणि सूरतच्या 770 किलोमीटर दक्षिण-नैऋत्येकडे दाबाचा पट्टा तयार होईल,” असे आयएमडीने पुढे सांगितले.
'पुढच्या 48 तासांत मच्छिमारांनी आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप भागात आणि केरळ किनारपट्टीवर जाऊ नये. पूर्व-मध्य अरबी समुद्रासह कर्नाटक-गोवा किनाऱ्यांवर 3 जूनपर्यंत जाऊ नये. तसेच, पूर्व-मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा आणि ईशान्य अरबी समुद्रासह गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर 3 ते 4 जूनदरम्यान जाऊ नये,' असे आयएमडीने सांगितले आहे.
याशिवाय, पुढील दोन तासांत राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही आयएमडीने वर्तविली आहे. या भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही आयएमडीने दिला आहे.
“येत्या दोन तासांत हरियाणातील कर्नाल, सोनीपत, पानीपत आणि उत्तर प्रदेशातील शामली, बागपत, गाझियाबाद, मोदीनगर, मेरठ आणि दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. या वेळी, 20 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील,' असे आयएमडीने सांगितले आहे.