महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फनी चक्रीवादळ : मृतांचा आकडा ६४ वर, मुख्यमंत्र्यांचे घरांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश - house damage assessment

पुरी येथे सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत. याखालोखाल खुर्दा (९), कटक (६), मयूरभंज (४), केंद्रपाडा (३) आणि जजपूर (३) अशी बळींची संख्या आहे. राज्य आणीबाणी कारवाई केंद्राने (SEOC) ही माहिती दिली. ३ मे रोजी पुरी येथे २४० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहात होते. २४१ लोक जखमी झाले.

फनी चक्रीवादळ

By

Published : May 13, 2019, 1:57 PM IST

भुवनेश्वर - फनी चक्रीवादळानंतर मृतांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. हा आकडा तब्बल २१ ने वाढून तो ६४ वर पोहोचला आहे. या विनाशकारी वादळाचे भीषण परिणाम नऊ दिवसांनंतरही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी घरांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

पुरी येथे सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत. याखालोखाल खुर्दा (९), कटक (६), मयूरभंज (४), केंद्रपाडा (३) आणि जजपूर (३) अशी बळींची संख्या आहे. राज्य आणीबाणी कारवाई केंद्राने (SEOC) ही माहिती दिली. ३ मे रोजी पुरी येथे २४० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहात होते. यात किमान २४१ लोक जखमी झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री पटनाईक यांनी पडझड झालेल्या घरांची तपासणी करून संबंधित घरमालकांना त्याची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. १५ मे पासून एका आठवड्यात या घरांच्या पडझडीचे मूल्यांकन करावे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

'वादळामध्ये माझे घर कोसळले. ४ मे पासून सरकारकडून कोणीही माझे पडलेले घर पाहाण्यासाठी आले नाही. ते या पडझडीचे मूल्यांकन करून भरपाई देतील की नाही किंवा माझे घर पुन्हा बांधण्यासाठी मदत करतील की नाही, हे मला माहिती नाही,' असे शांतिलता मिश्रा यांनी म्हटले आहे. त्या पुरी जिल्ह्यातील बिरारामचंद्रपूर गावातील विधवा महिला आहेत. अशाच प्रकारे अनेक गरीब लोकांच्या घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. चक्रीवादळात सापडलेल्या लोकांच्या सरकारकडून मदतीच्या अपेक्षा हळूहळू मावळू लागल्या आहेत.

मुख्यमंत्री पटनाईक यांनी वादळात नुकसान झालेल्या प्रत्येकाला नुकसान भरपाई मिळेल, अशी खात्री देत असल्याचे म्हटले आहे. ज्यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे किंवा घरे पूर्णपणे कोसळली आहेत, त्यांना पक्की घरे बांधण्यासाठी मदत करण्यात येईल, असे पटनाईक म्हणाले.

सूत्रांनुसार, ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (OSDMA) मागील १२ वर्षांत राज्याच्या विविध भागांमध्ये १५ लाख २६ हजार ८७७ घरांची पडझड झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये फनी चक्रीवादळामुळे झालेल्या हानीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. यामध्ये ५ लाख ८ हजार ४६७ घरांची पडझड झाली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे यासाठी ७ हजार कोटींची मदत मागितली आहे.

ओडिशातील लोक सध्या रस्त्यावर आले आहेत. नऊ दिवसांनंतरही त्यांच्याकडे वीज, पिण्याचे पाणी उपल्बध नाही. त्यातच पडझड झालेली घरे पुन्हा बांधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले लोक आणि ओडिशातील विरोधक राजकीय पक्ष यांनी वादळानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details