नवी दिल्ली - ओडिशात फनी चक्रीवादळाच्या बळींची संख्या ५ मे अखेर २९ वर पोहोचली आहे. यापैकी केवळ पुरी येथील २१ बळी आहेत. केंद्र सरकारने ओडिशात अत्यंत गंभीर स्थिती असल्याचे सांगत राज्याला १ हजार कोटींची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे. येथे ३ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला होता. मागील २ दिवसांत ओडिशा किनारपट्टीवरील स्थिती अत्यंत गंभीर होती. पिण्याच्या पाण्याची कमतरता, वीज खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. एकंदरित १ कोटी लोकांना याचा फटका बसला आहे.
वादळामुळे कमकुवत घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक झाडे, विजेचे खांब, मोबाईलचे टॉवर उन्मळून पडले. शासनाने येथे मोठे बचावकार्य सुरू केले आहे. १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांमध्ये बचावकार्य सुरू आहे. भारतीय नौसेनेही बचावकार्यात सहभाग घेतला आहे. आपत्तीग्रस्तांसाठी खाण्या-पिण्याच्या वस्तू पुरवण्यासाठी कम्युनिटी किचन तयार करण्यात आले आहेत. तसेच, बचाव शिबिरेही तयार करण्यात आली आहेत.
भारतीय नौसेनेकडून बचावकार्य भारतीय नौसेनेकडून बचावकार्य
पंतप्रधान मोदी ओडिशाला पोहोचले
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाच्या आपत्तीग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी पोहोचले. हेलिकॉप्टरने सर्व आपत्तीग्रस्त प्रदेशाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांनी केंद्रातर्फे ओडिशाला १ हजार कोटींची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे. मोदींनी काल मुख्यमंत्री पटनाईक यांच्याशी संवाद साधून राज्याच्या परिस्थितीविषयी चर्चा केली होती. त्यांनी राज्य सरकारला सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सरकारने आपत्तीशी लढण्यासाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था केली असल्याचे सांगितले. 'नवीन बाबूंनी चांगला प्लॅन केला आहे. भारत सरकार त्यांना यामध्ये सर्व प्रकारे साथ देईल,' असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी ओडिशा दौऱ्यावर
मुख्यमंत्री पटनाईक यांनी केले हवाई सर्वेक्षण
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी येथील वादळ प्रभावित भागांची पाहणी केली. याआधी सामाजिक संस्था, एनडीआरएफ, ओडिशा आपत्ती बचावकार्य दलाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसह सुमारे २ हजार आपात्कालीन कर्मचारी जनजीवन सुरळीत करण्याचे काम करत आहेत.