भुवनेश्वर- पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीसाठी ओडिशा सरकारने ५०० जणांचे आपत्ती निवारण पथक पाठवले आहे. अम्फान वादळाचा पश्चिम बंगालला मोठा तडाखा बसला आहे.आपत्तीच्या काळात आम्ही पश्चिम बंगालच्या सोबत आहोत, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ट्विट करून म्हटले आहे.
ओडिशाने 300 अग्निशामन दलाचे जवान तर ओडिशा आपत्ती निवारण पथकाच्या दहा तुकड्या पश्चिम बंगालला पाठवल्या आहेत.
५०० आपत्ती निवारण पथकाचे जवान आणि अग्निशामन दलाचे जवान कोसळून पडलेली झाडे कापण्यासाठीचे लागणारे साहित्य घेऊन शेजारील राज्य पश्चिम बंगालमध्ये मदत कार्यासाठी गेल्याचे राज्य मदत व पुनर्वसन विभागाचे आयुक्त प्रदीप जेना यांनी सांगितले. वादळामुळे सर्वात जास्त फटका बसलेल्या ठिकाणी आम्ही पाठवलेले पथक रस्ते वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी रस्त्यावर कोसळलेली झाडे हटवून रस्ते साफ करण्याचे काम करणार आहे, असे जेना म्हणाले.
ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांना अम्फान वादळाचा तडाखा बसला आहे. केंद्र सरकारने ओडिशा राज्याला 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा राज्यातील आपत्तीग्रस्त भागाचा हवाई दौरा केल्यानंतर एका दिवसाने ही घोषणा करण्यात आली. प्रदीप जेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मदतीसाठी आभार मानले आहेत