नवी दिल्ली -अम्फानचा फटका देशातील पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना बसणार आहे. 180 ताशी किमी वेगाने जोरदार वारे वाहत असून हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करणार आहे. वादळाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे भूसख्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे
चक्रीवादळ अम्फान : दक्षता व मार्गदर्शक तत्त्वे वादळाचा सामना करण्यासाठी विविध उपायोजना करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी व लगतच्या जिल्ह्यांना (गजपती, गंजम, नयागढ, पुरी, खोर्डा, कटक, जगतसिंहपूर, केंद्रापाडा, जाजपूर, भद्रक, बालासोर आणि मयूरभंज) यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा आपत्ती रॅपिड अॅक्शन फोर्सच्या 20 टीम (ओडीआरएएफ), राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाच्या 17 टीम (एनडीआरएफ) आणि अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनाच्या 335 तुकड्या सज्ज करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 19 पथके तैनात करण्यात आले आहेत.
ओडिशामध्ये आतापर्यंत 1704 निवारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच 1 लाख 19 हजार 75 लोकांना धोकादायक भागातून बाहेर काढण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने पश्चिम बंगाल, ओडिशा, सिक्किम, आसाम आणि मेघालय या राज्यांना 21 मेपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
पुढील काही दिवस मच्छिमारांना किनारपट्टी भागात जाण्याची परवानगी नाही.
मार्गदर्शक तत्त्वे -
- चक्रीवादळाबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि चुकीची माहिती पसरवू नये. अफवांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःदेखील त्या पसरवू नका. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.
- न शिजवता खाता येईल, असे भरपूर अन्न गोळा करून ठेवा. झाकून ठेवलेल्या भांड्यात स्वच्छ पाणी झाकून ठेवा.
- चक्रीवादळ इशारा मिळाल्यानंतर पुढील २४ तास दक्ष राहा. जेव्हा तुमचा परिसर चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येण्याचा इशारा असेल तेव्हा समुद्र किनाऱ्याजवळील सखल भागातून दूर जा.
- काचेच्या खिडक्यांवर सुरक्षा कवच लावा
- शासकीय माहितीवर विश्वास ठेवा.
- तुमच्या घरातील विजेचा मुख्य पुरवठा बंद करा
- संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तुमच्या परिसरात झालेल्या नुकसानाविषयी माहिती द्या.
- शासनाच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवा. यामुळे चक्रीवादळानंतर निर्माण होणाऱ्या आणीबाणीसाठी तयारी करण्यास मदत मिळेल
.