रामेश्वरम -तामिळनाडू येथील पम्बन बंदराच्या अधिकाऱ्यांनी अम्फान या तीव्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पम्बन पुलाजवळ सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने देखील हे वादळ उग्र रूप धारण करेल, असा इशारा दिला आहे.
रविवारी रामेश्वरम येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळ देखील निर्माण झाले होते. बंदराजवळील परिसराला त्याचा चांगलाच तडाखा बसला असून जवळपास मच्छिमारांच्या ५० बोटींचे नुकसान झाले.
बंगालच्या खाडीत जो हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तो एका चक्रीवादळात रुपांतरीत होऊन ओडिशा किंवा पश्चिम बंगालच्या तटाजवळून जाण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले. जोरदार हवेमुळे आणि मोठ्या लांटामुळे समुद्र किनाऱ्यावरील राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तुफानी वादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेनेलाही सतर्क करण्यात आले आहे.
संबंधित सरकारी विभाग आणि किनारपट्टीवरील १२ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ओडिशाचे विशेष मदत आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.