श्रीनगर(जम्मू-काश्मीर) - राज्याच्या उर्जा विकास विभागावर सायबर हल्ला झाला आहे. या विभागाच्या चार सर्व्हरमधील माहिती करप्ट झाली आहे. पीडीपीचे वरिष्ठ अभियंता एजाज दार यांनी ईटीव्ही भारतला सांगितले, की बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता पीडीपीच्या डाटा सेंटरवर सायबर हल्ला झाल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याबद्दल तक्रार केली असून सायबर क्राईम विभागाने याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
पुढे एजाज म्हणाले, की सायबर पोलिसांच्या आदेशानुसार आम्ही हल्ला झालेले सर्व्हर वेगळे करून ठेवले आहेत. सध्या श्रीनगरच्या डेटा सेंटरमध्ये ५५ डेटाबेस सर्व्हर आहेत. त्यातील ४ सर्व्हरवर हा हल्ला झाला आहे. दरम्यान, आम्ही आमच्या आयटी तज्ञांनाही अंतर्गत ऑडिटसाठी बोलविले आहे. या प्रकारच्या हल्ल्याला रॅन्समवेअर असे म्हणतात. यामध्ये हॅकर सर्व्हरमधील सर्व डेटा लॉक करतो, त्यामुळे वापरकर्त्यांना त्या सर्व्हरमधील माहिती मिळत नाही.
या प्रकरणी पोलिसांनी डेटा सेंटरला भेट दिली असून या हल्ल्याच्या तीव्रतेचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात ग्राहकांचा डेटा सुरक्षित असल्याची माहिती एजाज दार यांनी दिली. तसेच या महिन्याचे बिलिंग सायकल आधीपासूनच तयार करण्यात आले होते. त्यामुळे या हल्ल्याचा त्यावर काहीच परिणाम होणार नाही. मात्र, सध्या ऑनलाइन पेमेंट शक्य नसल्याने ग्राहकांना बँकांमध्ये ऑफलाइन पद्धतीने बिले द्यावी लागतील.
दरम्यान, सायबर क्राईम पोलिसांनी या हल्ल्यात चीनच्या हॅकर्सचा सहभाग आहे की नाही, याबद्दल टिप्पणी करणे टाळले आहे. रॅन्समवेअर हल्ले हे ऑनलाइन फसवणुकीसाठी केले जातात. त्यामुळे याप्रकरणात चीनच्या हॅकर्सचा हात आहे की नाही, याबद्दल सांगणे कठीण असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या शासकीय कार्यालयावर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इतर शासकीय कार्यालयांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे.