हैदराबाद - रशियन बनावटीच्या स्पुटनिक -५ या कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या घेण्यास भारताच्या औषध महानियंत्रक कार्यालयाने (डीसीजीआय) डॉ. रेड्डी लॅब औषधनिर्मिती कंपनीला नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कंपनीवर 'सायबर' हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या संगणकीय माहितीवर सायबर हल्ला होत असल्याचे दिसले, असे कंपनीने म्हटले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कंपनीने ऑनलाइन कामकाज थांबविले आहे. विविधमाहिती केंद्रांना देण्यात येणाऱ्या सुविधा कंपनीने सुरक्षेचा उपाय म्हणून थांबविल्या आहेत. या सायबर हल्ल्यामुळे कंपनीच्या कोविड लसीच्या चाचण्यास खीळ बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सायबर हल्ल्यानंतर कंपनीचे मुख्य माहिती अधिकारी मुकेश राठी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या २४ तासांत आम्ही सर्व सेवा सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. या हल्ल्यामुळे आमच्या कामकाजावर जास्त काही प्रभाव पडला नसल्याचे राठी म्हणाले. कंपनीच्या माहितीवर कोणी हल्ला केला याची माहिती कंपनीने उघड केली नाही.