नवी दिल्ली- आता इ-वॉलेटमध्ये क्रेडिटकार्डद्वारे पैसे टाकल्यास २ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. हा शुल्क पेटीएम कंपनीकडून घेण्यात येणार आहे. आधी इ-वॉलेटमध्ये एका महिन्यात १० हजार पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास हा शुल्क भरावा लागत होता. मात्र, आता कंपनीने या नियमात बदल केला आहे. त्यामुळे, ग्राहकांना आपला खिसा थोडा ढिला करावा लागणार आहे.
पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरताना, २ टक्के नाममात्र शुल्क भरणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा वॉलेटमध्ये पैसे जमा करता तेव्हा आम्ही तुमच्या बँक किंवा पेमेंट नेटवर्कला मोठे शुल्क देतो. कृपया कुठलेही शुल्क न देता वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी यूपीआय किवा डेबिट कार्ड वापरा, असा संदेश क्रेडिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे जमा करताना अॅपवर दिसून येतो. असे जरी असले तरी पेटीएमकडून या संबंधी एक ऑफरही देण्यात आली आहे. यात वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने कमीत कमी ५० रुपये टाकल्यास ग्राहकाला २०० रुपयांपर्यतचा २ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.