शिमला - कोविड -19 च्या साथीच्या काळातही शनिवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिमाचल प्रदेशात भाविकांनी मंदिरांत प्रचंड गर्दी केली होती.
ऊना जिल्ह्यातील चिंतपूर्णी मंदिराचे अधिकारी जीवन कुमार यांनी उत्सवाच्या तोंडावर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगितले. मंदिर दररोज सकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत भाविकांसाठी खुले असेल, अशी माहिती त्यांनी दिली. दररोज 15 ते 20 हजार भाविक येण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
याशिवाय, बिलासपूर जिल्ह्यातील नैना देवी मंदिर, कांगडा जिल्ह्यातील ज्वालाजी व चामुंडा देवी मंदिर, हमीरपूर जिल्ह्यातील बाबा बालक नाथ मंदिर तसेच, शिमला जिल्ह्यातील भीमाकाली व हातेश्वरी मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सर्व प्रमुख मंदिरात गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगितले.