कानपूर -उत्तरप्रदेशातीलकुख्यात गुंड विकास दुबे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना विशेष पोलीस पथकाने त्याला चकमकीत ठार केले आहे. दुबे आठ पोलिसांच्या हत्येस जबाबदार होता. तसेच या खटल्यातील मुख्य आरोपी होता. जेव्हा पोलीस त्याला अटक करण्यासाठी कानपूरमधील बिकारु गावातील त्याच्या घरी गेले. तेव्हा त्याने साथीदारांच्या मदतीने नियोजनपूर्वक पोलिसांवर गोळीबार केला. यात आठ पोलीस ठार झाले तर सात जण जखमी. या प्रकरणानंतर राज्यभर खळबळ उडाली. विकास दुबेच्या मृत्यूनंतर आता अनेक बाबी आता उघडही होणार नाहीत. मात्र, विकास दुबेचा गुन्हेगारी जगतातील प्रवास कसा होता त्यावर एक नजर टाकू.
विकास दुबेने 1993 साली गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. काही तरुणांना बरोबर घेवून त्याने चोऱ्या, खून, दरोडे टाकण्याचा सपाटा लावला. कानपूर जिल्ह्यातील शिवली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बिकारू गावचा तो रहिवासी होता. त्याच्या विरोधात राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात 50पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अनेक प्रकरणांमध्ये त्याची चौकशी सुरू होती. तसेच तो तुरुंगातही अनेक वेळा गेला, मात्र, प्रत्येक वेळी राजकारणी, पोलीस आणि अधिकाऱ्यांशी असणाऱ्या संबंधांच्या जोरावर बाहेर आला.
बड्या नेत्यांशी होते संपर्क
कानपूर शहरापासून ते गाव खेड्यांपर्यंत विकास दुबेची दहशत होती. स्थानिक निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बंदुकीच्या जोरावर राजकारण्यांना मते मिळवून देण्याच काम त्याने सुरू केले. या काळात त्याचे सपा, बसपा, भाजपच्या बड्या नेत्यांशी संपर्क आला. 2001 साली त्याने भाजपच्या एका राज्यमंत्र्याची पोलीस स्टेशन घुसून हत्या केली. या 'हायप्रोफाईलट हत्येनंतर त्याने काही दिवसांनी आत्मसमर्पण केले. मात्र, थोड्याच दिवसातच जामिनावर बाहेर आला. त्यानंतर राजकारण्यांच्या वरदहस्ताने त्याने राजकारणात प्रवेश केला. नगर पंचायतीची निवडणुकही त्याने जिंकली होती.
शिवराजपूरमधून नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
गुंड विकास दुबेची राज्यातील मोठ्या राजकीय पक्षात चांगलीच ओळख होती. 2002 साली जेव्हा मायावती राज्याच्या मुख्यमंत्री होत्या, तेव्हा सिक्का, बिल्हौर, शिवराजपूर, रनियां, चौबेपूरसह कानपूर शहरात त्याची दहशत होती. तेव्हा त्याने अवैध धंदे आणि लोकांनी लुटमार करून संपत्ती कमावली. तुरुंगात असताना शिवराजपूर नगर पंचायत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
निवडणुकीतील विजयानंतर संतोश शुक्लाबरोबर वाद
1996च्या विधानसभा निवडणुकीत चौबेपूर मतदारसंघात हरिकृष्ण श्रीवास्तव आणि भाजप नेते संतोष शुक्ला यांच्यात अटीतटीची लढत झाली. श्रीवास्तव या नेत्याला निवडून आणण्याचे फर्मान विकास दुबेने जारी केले. त्यामुळे शुक्ला आणि दुबेमध्ये भांडण झाले. ही निवडणूक हरिकृष्ण श्रीवास्तव या नेत्याने जिंकली. विकास दुबे आणि त्याचे साथीदार विजयानंतर जल्लोष करत असताना संतोष शुक्ला तेथून जात होता. त्यावेळी विकास दुबेने शुक्लाची गाडी अडवून शिव्या देण्यास सुरुवात केली. यावेळी जोरदार भांडण झाले. त्यानंतर संतोष शुक्लाला ठार करण्याची धमकी विकास दुबेने दिली. दोघांच्या भांडणात पुढचे पाच वर्ष अनेकांची हत्या झाली.
राज्यमंत्र्याची पोलीस स्टेशनमध्ये घुसून हत्या
2001 साली राज्यात भाजपची सत्ता आली. त्यावेळी संतोष शुक्लाकडे राज्यमंत्री पद होते. त्यामुळे दोघांमधील वाद आणखीनच चिघळला. इतर भाजप नेत्यांनी विकास दुबे आणि संतोष शुक्ला यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाली नाही. संतोष शुक्लाने सत्तेत असल्यामुळे विकास दुबेला चकमकीत ठार मारण्याचा प्लॅन आखला. मात्र, याची कुणकुण दुबेला लागली. संतोष शुक्ला एका सभेला संबोधित करीत असताना विकास दुबे आपल्या साथीदारांसह तेथे पोहचला आणि शुक्लावर गोळीबार केला. यातून शुक्ला जीव वाचवून पळाला आणि शिवली पोलीस ठाण्यात पोहचला. मात्र, विकास दुबे आणि त्याचे साथीदार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलीस ठाण्यात घुसुन त्यांनी संतोष शुक्लाला गोळ्या घालून ठार मारले.