राजस्थान - राज्यातील करौली जिल्ह्यात एका पुजाऱ्याच्या हत्येने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी जिल्ह्यातील सपोटरा तहसीलमधील एका गावात मंदिरातील पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. गुरुवारी गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याची जयपूरमधील सवाई माधोसिंह रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात या विषयावरुन राजकारण पेटले आहे. विरोधकांनी गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या घटनेनंतर पीडित कुटुंबीय आणि अनेक संघटनांनी आंदोलन केले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विरोधी पक्षनेत्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध करत दु:ख व्यक्त केले आहे. तर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेक संघटनांनी मोर्चा नेला.
जमीनीच्या वादातून पुजाऱ्याला जिवंत जाळले काय आहे प्रकरण ?
करौली जिल्ह्यातील सपोटरा तहसील अंतर्गत बुकना गाव येते. या गावात राधागोपाल मंदिर असून बाबूलाल वैष्षव मंदिराचे पुजारी होते. मंदिराच्या जागेजवळच ते घर बांधणार होते. त्यासाठी जमीन समतल करण्याचे काम सुरू होते. मात्र, गावातील काही नागरिकांना ही गोष्ट खटकली होती. काही दिवसांपूर्वी २०-२५ लोकांनी बाबूलाल यांना घर बांधण्यावरून धमकी दिली होती. तसेच परिणाम भोगावे लागतील, असा दम भरला होता.
गावगुंडांनी पंचाचेही ऐकले नाही
धमकी दिल्यानंतर पुजारी बाबूलाल यांनी हे प्रकरण गावातील पंचायतीपुढे नेले होते. पंचांनी पुजाऱ्याच्या बाजूने निर्णय देत या गावगुंडांना समज दिली होती. मात्र, तरीही त्यांनी पुजाऱ्याचा राग मनात धरला होता. ७ ऑक्टोबरला पेट्रोल टाकून या गावगुंडांनी पुजाऱ्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. तर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. सर्व दोषींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिले आहे. मागील दोन दिवसांपासून ज्या रुग्णालयात पुजाऱ्यावर उपचार सुरू होते, त्याच्या बाहेर कुटुंबीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यास अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे.