कोलकाता - बिहारमध्ये डावे पक्ष हे महाआघाडीमध्ये सामील होते. तेथे त्यांनी काँग्रेसपेक्षाही चांगली कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्येही असेच युती करून डावे पक्ष बिहारमधील कामगिरी पुन्हा दाखवतील का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र, याबाबत दोन प्रमुख डाव्या पक्षांमध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. त्यांचासमोर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे, की भाजपाला आपला मुख्य विरोधक मानावे, की तृणमूलला?
सीपीआय (एम) (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी) आणि सीपीआय (एमएल) (भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी) या दोन्ही पक्षांमध्ये केवळ वैचारिक मतभेद असल्याचे यापूर्वी वाटत होते. मात्र, आता या दोघांमध्ये कोणाला विरोधक मानायचे यावरून मोठ्या प्रमाणात मतभेद तयार झाले आहेत. सीपीआय(एम)चे महासचिव सीताराम येचुरी यांच्यामते भाजपाशी लढायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्याला तृणमूलला हरवायला हवे. तर, दुसरीकडे सीपीआय (एमएल)चे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांच्या मते आपला सर्वात मोठा शत्रू भाजपाच आहे. त्यामुळे देशभरात कशाही प्रकारे आपण भाजपाला थोपवायला हवे.
माले पॉलिटब्यूरोच्या सदस्या कविता कृष्णन यांनी या मुद्द्यावरुन सीपीआय (एम)ला उघड विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, की मोदी आणि ममता यांना आपण एकच मानू शकत नाही. आज भाजपाशी लढा देण्याची ताकद (पश्चिम बंगालमध्ये) केवळ तृणमूलमध्ये आहे. त्यामुळे सीपीआय (एम) उगाचच 'दीदीभाई' आणि 'मोदीभाई' या मुद्द्याचा बाऊ करत असल्याचे कविता म्हणाल्या.