नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे कोरोना लस कधी येणार, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिली. पुढील वर्षांच्या सुरुवातील कोरोना लस उपलब्ध असेल, असे त्यांनी सांगितले. संसदेत पावसाळी अधिवेशनादरम्यान ते बोलत होते.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन इतर देशांप्रमाणेच भारतही प्रयत्न करत आहे. सध्या तीन कोरोना लस चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ गट कार्य करत असून प्रगत नियोजन करण्यात येत आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोना लस भारतामध्ये उपलब्ध असेल, अशी आम्हाला अशा आहे, असे ते म्हणाले.
लस उपलब्ध झाल्यानंतर तीच्या वितरणासंदर्भातही आम्ही नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात लस कुणाला दिली जाईल, कशी दिली जाईल, याचा सर्व कार्यक्रम ठरला आहे, असेही ते म्हणाले.
भारतात लस तयार करण्यात येतच आहे. याचबरोबर रशियाही भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरीज या कंपनीला आपल्या कोरोनावरील लसीचे 100 दशलक्ष डोस देणार आहे. रशियन डायरेक्ट इन्ह्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) बुधवारी याबाबतची माहिती दिली. गेल्या 25 वर्षांपासून रशियामध्ये डॉ. रेड्डीज ही प्रतिष्ठित कंपनी आहे. तसेच, भारतातही ही कंपनी लोकप्रिय आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 97 हजार 894 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 51 लाखांवर गेली आहे. तर बुधवारी 11 लाख 36 हजार 613 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 6 कोटी, 5 लाख, 65 हजार 728 एवढी झाली आहे.