हैदराबाद-भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 63 हजार 490 रुग्ण वाढल्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्या 25 लाख 89 हजार 600 वर पोहोचली आहे. 18 लाख 62 हजार 258 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारपर्यंत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 71.91 टक्के एवढा झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार 49980 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 944 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 7 ऑगस्टपासून भारतात 60 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.फक्त 11 ऑगस्टला 53 हजार 601 कोरोना रुग्ण वाढले होते. भारतातील कोरोनाने होणारा मृत्यू दर 1.93 टक्के एवढा झाला आहे. सध्या 6 लाख 77 हजार 444 जणांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र-
मुंबई- राज्यात रविवारी 8 हजार 837 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण 4 लाख 17 हजार 123 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 70 टक्के एवढे आहे. रविवारी 11 हजार 111 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 58 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दिल्ली
नवी दिल्ली-राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशभरात आम आदमी पक्षाकडून 30 हजार गावांमध्ये रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी शिबीर घेणार असल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतल कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजार 580 वर पोहोचली आहे. दिवसभरात 652 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत दिल्लीत 4196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 1310 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीतल कोरोनामुक्त होण्याचा दर 90.15 टक्के झाला आहे.