हैदराबाद -कोरोना महामारीने २०२० वर्षात संपूर्ण जगाला जेरीस आणलं. त्यातून भारतही सुटला नाही. मात्र, आरोग्य क्षेत्रापुरतेच हे संकट मर्यादित राहिले नाही. व्यापार, शिक्षण, पर्यावरण, अर्थव्यवस्थेलाही कोरोनाची झळ पोहचली. हे कमी म्हणून चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे देशाची सुरक्षाही धोक्यात आली. नववर्षाचे सर्वजण जल्लोषात स्वागत करतील. मात्र, देशासमोरील संकटे एका दिवसात संपणार नाहीत. २०२१ मध्ये भारतासमोर कोणती मोठी संकटे असतील याचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा...
भारत-चीन सीमावाद -
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमावाद अद्यापही सुटलेला नाही. पँग्यॉग लेकच्या काही भागात चीनने अतिक्रमण केले असून भारतानेही चीनला धडा शिवण्यासाठी मोक्याच्या जागांवर सैन्य तैनात केले आहे. मात्र, राजनीतिक, लष्करी आणि विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चांतून अद्यापही तोडगा निघाला नाही. २०२० वर्षात हा वाद तसाच राहिला असून २०२१ वर्षात हा वाद मिटेल अशी आशा आहे.
सीमावादानंतर चिघळलेल्या स्थितीत भारताने अनेक चिनी अॅपवर बंदी घातली आहे. तसेच चीनसोबतचे व्यापारी संबंधही ताणले आहेत. चीनसोबतच्या वादात भारताला अमेरिकेचा पाठिंबा असून त्यामुळे चीन अधिकच चवताळलेला आहे. सीमेवर पूर्वी होती तशी स्थिती पुन्हा यावी, यासाठी भारत आग्रही आहे. मात्र, चीनने सीमेवरील काही ठिकाणांवर दावा केला आहे. त्यास भारत तयार नाही. भारतीय सीमांचे सरक्षण करण्यास लष्कर कटिबद्ध असून चीनसोबतच्या धुमश्चक्रीत आपल्या २० जवानांना वीरमरण आले.
कोरोना व्हायरस -
भारतामध्ये कोरोनाचा प्रसार आता कमी झाला असून मागील सहा महिन्यांपासून रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. कोरोनावरील लसही शेवटच्या टप्प्यात आहे. सीरम, भारत बायोटेक यांच्या लसींनी भारत सरकारकडे आणीबाणीच्या काळात लस वापराचा परवाना मागितला आहे. अद्याप या अर्जांची काळजीपूर्वक छानणी सुरू आहे. भारतात कोणत्याही लसीला अद्याप मिळाली नाही. मात्र, यावर सरकार गांभीर्याने विचार करत असून येत्या काही दिवसांत लसीला परवाना मिळणार आहे. त्यानंतर देशभरात लसीकरण सुरू होईल. त्यासाठीची प्रशासकीय तयारी भारत सरकारने सुरू केली आहे.
नवा विषाणू २०२१ मध्ये डोकेदुखी ठरणार का ?
आधीच कोरोनाने संपूर्ण जगाला जेरीस आणले असताना आता कोरोनाचा नवा विषाणू ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा जास्त वेगाने पसरत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत. नागरिकांमध्ये नव्या विषाणूची भीतीही पसरली आहे. येत्या वर्षात कोरोना समूळ नष्ट होईल, अशी आशा करूया. नव्या कोरोचे भारतात सहा रुग्ण सापडले आहेत.
अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येणार?
2020 वर्षात भारताचा विकास दर उणे नोंदविला गेला. पर्यटन, उत्पादन, सेवा, वाहन, बँकिंग, कृषीसह अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांना लॉकडाऊचा फटका बसला. मात्र, आता कोरोना निर्बंध शिथील केल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. मात्र, अद्यापही पूर्णत: अर्थव्यवस्था रुळावर आली नाही. उद्योगधंद्यांचे नुकसान झाले. लहान उद्योग डबघाईला आले. अनेकांचे रोजगारही गेले. त्यामुळे येत्या वर्षात अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणे हे सरकारपुढे मोठे आवाहन असणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. उद्योगांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या. देशात नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्यास पुन्हा अर्थव्यवस्था धोक्यात येईल. त्यामुळे अर्थव्यवस्था सांभाळत कोरोनाचा सामना करणे हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे.
भारताचा जुना मित्र दुरावणार का?
चीनविरोधी मोहिमेत युरोप आणि अमेरिका भारताचा वापर करत आहेत, असे मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गी लारोव्ह यांनी व्यक्त केले होते. भारत-रशिया संबंधात दुरावा आणण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य देश करत असल्याचा आरोपही लारोव्ह यांनी केला आहे. भारत आणि रशियाचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आहेत. अडचणीच्या काळात रशिया भारताच्या मदतीला धावून आलेला आहे. मात्र, बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारत आता अमेरिकेच्या जवळ जात आहे. याचा परिणाम रशिया आता चीन आणि पाकिस्तानच्या जवळ जात आहे. त्यामुळे रशियासोबतचे संबंध सांभाळताना नव्या मित्रांना हाताळणे भारतासाठी २०२१ वर्षात मोठे आव्हान असणार आहे.