हैदराबाद- भारतात दर दोन दिवसांनी 1 लाख कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. मात्र, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रनदीप गुलेरिया यांनी भारतात कोरोनारुग्ण संख्येची वाढ अत्युच्च पातळीवर पोहोचली नसल्याचे म्हटले आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 23 लाखांवर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 46 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली
नवी दिल्ली- काही काळ कोरोना रुग्णसंख्या वाढ कमी झाल्यानंतर दिल्लीत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. मागील 7 दिवसांत दररोज 1 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. सोमवारी 707 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. नवी दिल्ली सरकारच्या माहितीनुसार 13906 कोरोना बेडपैकी 3318 बेड वापरात आहेत. बुधवारी 1113 कोरोना रुग्णसंख्या वाढली.त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या 1.48 लाख एवढी झाली. दिल्लीत कोरोनामुळे 4153 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत एकूण रुग्णसंख्या 1 लाख 48 हजार 504 आहे. 1 लाख 33 हजार 405 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीत सध्या 10 हजार 946 सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र
मुंबई-राज्यात बुधवारी पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बिहार
पाटणा-दररोज राज्यामध्ये 1 लाख लोकांच्या कोरोना तपासणी करणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. आरटीपीसीआरद्वारे दररोज 75 हजार नमुने तपासले जात आहेत. आरटीपीसीआर सुविधा आणखी 5 वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करणार असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले. यामुळे प्रतिदिन सरासरी 2300 तपासण्या वाढतील असे त्यानी सांगितले.