हैदराबाद : कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे २०२०सालासाठी करण्यात आलेले सर्व नियोजन कोलमडले आहेत. राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास, याचा सर्वात मोठा फटका निवडणूक आणि पर्यायाने लोकशाहीला बसला आहे. लोकशाही आणि निवडणूक सहकार्यासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी ते २१ जून २०२० यादरम्यान जगभरातील तब्बल ६६ देश आणि प्रांतांमधील राष्ट्रीय आणि प्रांतीय निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
भारतातील निवडणुका..
बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमधील निवडणुका २९ नोव्हेंबर, २०२०पूर्वी होणे अनिवार्य आहे. तसेच पश्चिम बंगाल (३० मे २०२१), आसाम (३१ मे २०२१), केरळ (१ जून २०२१), तामिळनाडू (२४ मे २०२१) आणि पद्दुचेरी (८ जून २०२१) या दिलेल्या तारखांपूर्वी संबंधित राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडणे अनिवार्य आहे.
राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका ज्याप्रमाणे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलता येतील, त्याप्रमाणे लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका या केवळ सहा महिन्यांकरताच पुढे ढकलण्याची तरतूद संविधानामध्ये करण्यात आली आहे.
याहून अधिक कालावधीसाठी निवडणुका पुढे ढकलण्यासाठीही संविधानामध्ये तरतूद आहे. कलम १७२(१) नुसार, आणिबाणी लागू केली गेली असता, अशा निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्यात येऊ शकतात. तसेच, आणीबाणी उठवल्यानंतर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका आणखी सहा महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात येऊ शकतात. मात्र, आणिबाणी केवळ राष्ट्राच्या सुरक्षेला किंवा सार्वभौमत्त्वाला धोका असल्यावरच लागू करता येते, एखाद्या महामारीकरता नाही!
आणिबाणीव्यतिरिक्त दुसरा उपाय कलम ३५६(१) मध्ये दिला गेला आहे. तो म्हणजे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याची मर्यादा वारंवार परिभाषित केली आहे.