भारत एका अभूतपूर्व विशालतेच्या सार्वजनिक आरोग्य संकटातून जात आहे. आतापर्यंत कधीही आरोग्यविषयक आपत्तीने संपूर्ण राष्ट्राला संपूर्ण ठप्प केले नव्हते. लॉकडाऊन हा शब्द बहुतेक भारतीयांना अगदी एलियनसारखा अपरिचित होता. कोरोना विषाणु किंवा कोविड-१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्यसेवा आणि स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचार्याप्रति त्यांच्या निःस्वार्थी सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची हाक दिली, तेव्हा कित्येकांना या शब्दाचा अर्थ कळला.
मार्चपासून कोरोना रूग्णांची संख्या स्थिरपणे वाढत असल्याने देश कोरोना महामारीचा मुकाबला करताना वेळेशी स्पर्धा करत आहे तर, सरकार आणखी एका पेचप्रसंगाला सामोरे जात आहे. निगमबोधघाट येथे अधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी कोविड-१९ ने मृत्युमुखी पडलेल्या ६८ वर्षीय महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. असे मृतदेह हाताळण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अभावी या महिलेवर अंत्यसंस्कार करण्याचे नाकारण्यात आले.
आरएमएल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी, जेथे तिला दाखल केले होते, मध्यस्थी केल्यानंतर अखेरीस विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेच्या कुटुंबियांना अथकपणे तेथे तिष्ठत रहावे लागल्यानंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले आणि मग अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
हे या प्रकारचे एकमेव प्रकरण नाही. बिहारच्या एका गावात, कोविड-१९ ने मरण पावलेल्या एका व्यक्तिचा मृतदेह कुटुंबियांना अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातच दीर्घकाळ ठेवावा लागला. खूप मोठा जमाव घरासमोर जमल्याने अखेर संपूर्ण गावाचे विलगीकरण करावे लागले. कोलकात्यात, दुसऱ्या एका बळीच्या कुटुंबातील सदस्य मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी आलेच नाहीत आणि स्मशानभूमीतील लोकांनी संसर्गाच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. १० तासांच्या उशिराने मृतदेह अखेरीस विद्युत दाहिनीत जाळण्यात आला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड-१९ ने मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह हाताळणे, वाहतूक आणि अंत्यसंस्कार यासंबंधी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मृतदेहाचे व्यवस्थापन करताना घ्यायची खबरदारी, संसर्गाला रोखणे आणि नियंत्रणाचे उपाय, मृतदेह हाताळण्याचे आणि पर्यावरणीय निर्जंतुकीकरण याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असली तरीही, भारतात बहुतेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार उघड्यावरच केले जात असल्याने काही चिंतेचे मुद्दे आहेत. शहरांमध्ये विद्युतदाहिनीची सोय असली तरीही, जिल्हे आणि गावांमध्ये अंत्यसंस्कार उघड्यावर आणि नद्यांच्या किनाऱ्यावर केले जातात, ज्यामुळे मृतदेह निर्धारित केलेल्या नियमांनुसार हाताळण्यात आले नाहीत तर पर्यावरण संक्रमणाचा धोका असतो.
कोविड-१९ मुळे अतिरिक्त संसर्गाचा धोका नसतो, याबाबत स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यावर फोकस करतानाच, मार्गदर्शक तत्वे सांगतात की कर्मचाऱ्यांनी, तरीसुद्घा, हात स्वच्छ करणे, मास्क आणि हातमोजांचा वापर करणे या आदर्श खबरदारीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
नातेवाईकांना एकदा अखेरच्या वेळेला मृतदेह पहाताना चेहर्याकडील बाजूने पिशवीच्या अखेरच्या टोकापर्यंत चेन उघडण्याची (कर्मचाऱ्यांकडून आदर्श खबरदारीचे पालन) परवानगी दिली जाऊ शकते आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन, पवित्र पाणी शिंपडणे आणि इतर अंत्यविधींसाठी शरीराला स्पर्ष करण्याची गरज नसते. परंतु मार्गदर्शक तत्वांनी मृतदेहाला स्नान घालणे, चुंबन घेणे आणि मिठी मारणे याला परवानगी कडकपणे नाकारली आहे. मृतदेह जाळल्यावर किंवा पुरल्यावर अंत्यसंस्कार किंवा दफन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी हातांची स्वच्छता करणे आवश्यक आहे.