तिरुवअनंतपुरम - कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरात खबरदारी घेतली जात आहे. कित्येक ठिकाणी लोक स्वतःहून नियमांचे पालन करत आहेत, तर काही ठिकाणी प्रशासनाकडून याबाबत सक्ती दाखवली जात आहे. आता केरळच्या वायनाड जिल्हा प्रशासनानेही लोकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत.
वायनाडमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास तब्बल पाच हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. इलांगो यांनी आज (बुधवार) हे जाहीर केले आहे.
यासोबतच सर्व किराणा आणि इतर अत्यावश्यक दुकानांमध्ये सॅनिटायझर किंवा साबण ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. एखाद्या दुकानात या सुविधा उपलब्ध नसल्यास, त्या दुकानदाराला एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.