नवी दिल्ली -कोरोना संचारबंदीमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. मात्र, लवकरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळले जातील, असेही ते म्हणाले. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडेरशन ऑफ इंडियाच्या सदस्यांसोबत आज गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
बस आणि कारचा वापर करताना सोशल डिस्टन्स ठेवणे, सतत हात धूत राहणे, फेस मास्क वापरणे यासारख्या सुरक्षेच्या बाबी पाळणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. आपण सतत पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासंपर्कात आहोत. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही गडकरी यांनी केला.