नवी दिल्ली- मंगळवारी पुण्यात कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले. तर, जयपूरमध्येही आणखी एका रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासोबतच कर्नाटकात तीन, आणि केरळमध्ये आठ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत. त्यामुळे देशभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५९पर्यंत पोहोचली आहे.
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज एकाच दिवसामध्ये महाराष्ट्रात तीन, राजस्थानमध्ये एक, केरळमध्ये आठ, तर कर्नाटकात तीन नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली असून, केरळमध्ये १४, कर्नाटकात ४, पंजाबमध्ये एक, आणि राजस्थानमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण रुग्णांमध्ये इटलीच्या १५ नागरिकांचाही समावेश आहे.