नवी दिल्ली -फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे कोरोनाच्या लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्यानंतर आता फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. असा अर्ज करणारी फायझर इंडिया ही पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. फायझर इंडियाने ४ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. या लसीचा भारतात आपातकालीन स्थितीत वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे फायझरने केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये ४ हजार ७५७ नवे कोरोनाबाधित
रविवारी राज्यात ४,७५७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,५२,२६६ वर पोहचला आहे. राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७,७३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण ८०,०७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुण्यात 17 स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी
पुण्यात 17 स्वयंसेवकांवर कोरोना लसीची चाचणी केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 17 जणांवर 'स्पुटनिक व्ही' या कोरोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी व रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी ही कोरोनावरील लस तयार केली आहे.
देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी दीर्घकालील आजार असलेल्या लोकांना कोरोना लस सर्व प्रथम मिळावी
देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वांचे लक्ष आता कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले आहे. पुढील आठवड्यात कोरोना लस देशात उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ज्या लोकांना दीर्घकालीन आजार आहेत, अशा लोकांना कोरोनाचा सर्वाधीक धोका असून, या लोकांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मोदींकडे केली आहे. सोबतच वृद्ध व्यक्तींना देखील लस उपलब्ध करून द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडू कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. एस. अलगिरी यांना कोरोनाची लागण
तामिळनाडू कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. एस. अलगिरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी रविवारी कोरोना चाचणी केली आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती, टीएनसीसीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष ए. गोपान्ना यांनी दिली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन गोपन्ना यांनी केले आहे.
गुजरातमध्ये चार टप्प्यात मिळणार कोरोना लस
गुजरातमध्ये चार टप्प्यांत कोरोना लस उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रविवारी दिली आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस मिळेल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोना योद्धा जसे की पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना ही लस उपलब्ध करून देण्यात येईल, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्ष वयावरील सर्व व्यक्तींना ही लस मिळणार आहे. तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात 50 वर्षांखालील व्यक्तींना ही लस मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.