हैदराबाद- उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत सक्रिय रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येथील परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याकरिता उच्च-स्तरीय केंद्रीय समिती या राज्यांमध्ये रवाना करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. तसेच कोविड अडचणींचा सामना करण्यासाठी आयुर्वेद आणि योग संपूर्ण जगासाठी उपयुक्त ठरेल, असेही केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटले.
नवी दिल्ली -कोरोनाबाधीत रुग्णांसाठी गेल्या काही दिवसांत 400 पेक्षा जास्त आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी रविवारी दिली. तसेच पुढील काही दिवसांत बेडची संख्या वाढवणार असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई-दिल्लीत कोरोचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाणारी आणि येणारी उड्डाणे कमी करण्यााचा महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. तसेच दिवाळीमुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी पहायला मिळाली. यामुळे कोरोना संसर्ग वाढत असून येत्या काही दिवसांत लॉकडाउन लावण्यात येऊ शकते, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिला. स्थानिक क्षेत्रातील कोविड-19 च्या परिस्थितीनुसार राज्य सरकारने उद्यापासून 9 ते १२ वीच्या शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
शिमला- कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे आज सर्व बाजारपेठा व दुकाने बंद होते. मात्र, किराणा, दुध, फळे, भाज्या, मांस, औषधे आणि रेस्टॉरंट्सची विक्री करणार्या दुकानांना सूट देण्यात आली होती.
जयपूर -राजस्थान सरकारने शनिवारी आठ जिल्हा 'नाईट कर्फ्यू' घोषित केला होता. त्याची अमलबजाणी आज करण्यात आली. जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर, अलवर आणि भिलवाराच्या शहरी भागातील बाजारपेठा, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स आणि अन्य व्यावसायिक संस्था संध्याकाळी 7 पर्यंत खुल्या राहणार आहे. तर, रात्रीचे 8 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तसेच कामाच्या दिवसांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये कर्मचार्यांची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, विवाहसोहळा आणि राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये केवळ 100 लोकांनाच परवानगी असेल, असे आदेशही सरकारने दिले आहे.
गांधीनगर -गुजरामध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये या चार शहरांमध्ये सोमवारपासून 'नाईट कर्फ्यू' लागू केला जाईल, असे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रविवारी सांगितले.