महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारत कोविड १९ केसेस

देशात आत्तापर्यंत ८४ लाख ६२ हजार ८० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यातील १ लाख २५ हजार ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ लाख १९ हजार ८८६ व्यक्ती उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सद्य स्थितीत ५ लाख १६ हजार ६३२ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ही संख्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ६.११ टक्के आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 8, 2020, 4:19 AM IST

हैदराबाद -देशभरात मागील २४ तासांत ५० हजार ३५७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८४ लाख ६१ हजार ८१ झाली आहे. नवे रुग्ण सापडण्यात दिल्लीने आता महाराष्ट्र आणि केरळ राज्याला मागे टाकले आहे. राजधानीत मागील २४ तासांत ७ हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना अपडेट

'कोरोना काळात तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका'

पंतप्रधान मोदींनी आयआयटी मुंबईच्या ५१ व्या दिक्षांत समारंभात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, सध्याच्या कोरोना काळात तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. यामुळे कामाच्या पद्धतीत बदल झाला आहे. व्हर्च्युअल रिअ‌ॅलिटी ही वर्किंग रिअ‌ॅलिटी बनली आहे.

दिल्ली -

दिल्ली शहर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. रुग्णसंख्या येत्या काही दिवसांत कमी होण्याची आशा आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली आहे. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात अशी याचिका दिल्ली सरकारने उच्च न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती जैन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दिल्लीतील प्रत्येक सरकारी रुग्णालयात ५०० खाटा कोरोना रुग्णांसाठी वाढविण्यात आल्या आहेत, यातील ११० खाटा अतिदक्षता विभागातील आहेत. तर खासगी रुग्णालयात ६८५ खाटा वाढविण्यात आल्या आहेत. शनिवारी ७ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडल्यानंतर शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख २३ हजार ८३१ झाली आहे.

पश्चिम बंगाल -

पश्चिम बंगालचे पर्यटन मंत्री गौतम देब यांची शुक्रवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सिलीगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याच्या सचिवालयात त्यांनी काही दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यामुळे ते इतरांच्याही संपर्कात आले होते.

महाराष्ट्र -

राज्यात काल (शनिवार) ६,७४८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आत्तापर्यंत एकूण १५ लाख ६९ हजार ०९० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.५३ टक्के एवढे झाले आहे. काल राज्यात ३,९५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४५,११५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,७८,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१४,२७३ (१८.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७१,१६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्यस्थितीत एकूण ९९,१५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

केरळ -

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यपालांच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. 'मला कोरोनाची लागण झाली असून काळजी करण्याची गरज नाही. मागील आठवड्यात दिल्लीत असताना जे माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करुन घ्यावी', असे आवाहन त्यांनी केले.

राजस्थान -

भाजपचे आमदार नरपात सिंह राजवी आणि मदन दिलावर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लवकर बरे होण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details