हैदराबाद - भारतातील अंतर्गत नागरी विमान वाहतूक सेवा पुढील वर्षी २४ फेब्रुवारीपर्यंत एकूण क्षमतेच्या ६० टक्केच सुरू राहणार आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेता नागरी उड्डान विभागाने हा निर्णय घेतला आहे. २ ऑक्टोबरला अधिकृत आदेश काढत मंत्रालयाने विमान कंपन्यांना या निर्णयाची माहिती दिली होती. मात्र, कधीपर्यंत हा निर्णय लागू राहणार हे सांगितले नव्हते. ते आता स्पष्ट केले आहे.
देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ७६ टक्के रुग्ण हे दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. दिल्ली आणि केरळ राज्यात दरदिवशी ६ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात ४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी आढळत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीतून समोर आले आहे.
दिल्ली -
मागील काही दिवसांत दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही संसर्गाची तीसरी लाट असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी सांगितले. नागरिकांनी घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. सरकार परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे, असेही ते म्हणाले. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील बाजार फुलून गेले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत आहे.
महाराष्ट्र -
राज्यात बुधवारी ५ हजार ५०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज ८ हजार ७२८ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण १५ लाख ४० हजार ५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६८ टक्के एवढे झाले आहे.