हैदराबाद : देशातील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. जगभरातील कित्येक देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येताना दिसून येत आहे असे नीती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९ टास्कफोर्सचे पदाधिकारी डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी म्हटले. डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी ही ९० टक्क्यांहून अधिक आहे, तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांसारखी राज्ये वगळता इतर राज्यांमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी होत असल्याचे पॉल यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर पाहूया देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी..
मुंबई :केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाली. त्यांना कोरोनाची तीव्र लक्षणे नसून खबरदारी म्हणून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार होत आहेत. पक्षाच्या यापुढील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मंगळवारी राज्यात ५ हजार ३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.