हैदराबाद : देशातील दररोज नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. तसेच, दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढताना दिसून येत आहे. या सगळ्यातच आणखी एक चांगली बातमी म्हणजे, कोव्हॅक्सिन या स्वदेशी बनावटीच्या कोरोना लसीची मानवी चाचणी तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. ओडिशामध्ये लवकरच या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. तसेच, देशभरातील २१ वैद्यकीय संस्थांमध्ये ही चाचणी पार पडणार आहे.
देशातील कोरोना आकडेवारी.. या पार्श्वभूमीवर पाहूया देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी..
मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून, पुढील उपचारांसाठी त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून देण्यात आली.
तसेच, राज्यात सोमवारी 3 हजार 645 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 16 लाख 48 हजार 665 वर पोहोचला आहे. आज 84 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून आजपर्यंतर 43 हजार 348 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बंगळुरू :कर्नाटकमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा मैसूर दसरा उत्सव यावर्षी होणार नसल्याचे, राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी दसऱ्याला होणाऱ्या या उत्सवासाठी जगभरातून लाखो पर्यटक मैसूरला भेट देतात.
भोपाळ : मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने राज्यातील पोटनिवडणुकांसाठी राजकीय प्रचार रॅली करण्यास बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा आदेश रद्द केला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत.
अमरावती : तेलंगणाच्या कुर्नुल जिल्ह्यातील देवरगट्टू गावात होणारा पारंपारिक बन्नी उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, आंध्र-कर्नाटक सीमेवर ११ ठिकाणी पोलिसांनी चेक-पोस्ट उभारले आहेत. आज कर्नाटकहून येणाऱ्या आरटीसी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिकांनीही हा उत्सव साजरा करु नये यासाठी देवरगट्टू आणि इतर काही भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
हेही वाचा :रावण दहनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका