हैदराबाद -सलग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 60 हजारपेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर सध्या देशातील कोरोना मृत्यूदर 1.51 टक्के इतका आहे, अशी माहिती बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष ठेवावे, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 76 लाख 51 हजार 107 इतकी झाली आहे. त्यात 1 लाख 15 हजार 914 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. तर तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा सातत्याने वाढत आहे. तो सध्या 88.8 टक्के इतका आहे.
- दिल्ली
नवी दिल्ली -कोरोनाच्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठीराज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने क्लब, हॉटेल्स, मद्यविक्रीची दुकाने आणि रेस्टॉरंट्स यांना स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमनुसार (एसओपी) काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची आदेश दिले आहे.
सहाय्यक आयुक्त (अंमलबजावणी) यांना हॉटेल्स, क्लब आणि रेस्टॉरंट्समधील बारमध्ये एसओपीची पूर्तता तपासण्यासाठी टीम तैनात करण्यास सांगितले आहे..
दिल्ली विमानतळ ऑपरेटर डायलने बुधवारी म्हटले, कोरोनाशी संबंधित आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागतिक स्तरावर दुसरे सर्वात सुरक्षित एरोड्रोम असल्याचे प्रमाणपत्र दिले गेले आहे. सेफ ट्रॅव्हल बॅरोमीटरने पुढाकार घेत सेफ ट्रॅव्हल स्कोअर बनवले आहे. यात कोरोना कोळात आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीबद्दल 200 पेक्षा जास्त विमानतळांचे मूल्यांकन केले गेले.
- महाराष्ट्र
मुंबई - मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किंमतीत नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.