हैदराबाद- देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील 24 तासात देशात 70 हजार 589 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आजपर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 61 लाखांच्या वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशात मागील 24 तासात 776 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 96 हजार 318 एवढी झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात 84 हजार 877 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा एकूण 51 लाखांवर पोहचला आहे.
महाराष्ट्र -
मुंबई - महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये १९ हजार २१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १४ हजार ९७६ नवे कोरोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. कालही कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. आत्तापर्यंत राज्यात १० लाख ६९ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.२६ टक्के इतके झाले आहे.
नवी दिल्ली - शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांच्या संख्या वाढवण्यात येत असल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी आज दिली. खासगी आणि शासकीय रग्णांलयांमध्ये मिळून एकूण 1 हजार खाटा वाढवण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
तामिळनाडू -
चेन्नई - राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. एआयएडीएमकेने ट्विटरवर जाहीर केले की, राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामध्येही आणखी शिथिलता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.