नवी दिल्ली - भारतात आत्तापर्यंत ३८.५ लाखाहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले असून जगभरातील हे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी देशात कॉन्सवलसेंट प्लाझ्मा थेरपीचा पर्याय समोर आला आहे. कोविड -१९ राष्ट्रीय टास्क फोर्स आणि आरोग्य मंत्रालय यावर विचार करत आहे की, कोरोना उपचारामध्ये प्लाझ्मा थेरपी अशीच सुरू ठेवावी की, नाही, असे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे महानिर्देशक प्रा. डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण देशात सातत्याने कमी होत असून मृत्यूदर १.६४ टक्के इतका आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजनुसार कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा कवच लागू करण्यात येणार आहे, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्ली -
राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत मंगळवारी (15 सप्टेंबर) नवीन ३३७४ कोरोना रुग्णांची वाढ झाली. कोरोना रुग्ण आढळण्याच्या क्रमवारीत दिल्ली हे देशात पाचव्या क्रमांकाचे राज्य आहे. दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोरोना विषाणू तपासणी पॉझिटिव्ह आली आहे.
मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार गोवर्धन डांगी यांचे मंगळवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात तीन आठवड्यांपासून ते कोरोनाशी लढाई देत होते. ऑगस्टच्या मध्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.
तामिळनाडू-
द्रविड मुनेत्र कळघम (द्रमुक)चे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे कोरोना परिस्थितीविषयी श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सध्याच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी स्टॅलिन यांनी केली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये तामिळनाडूचा समावेश आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या 46,912 सक्रिय रुग्ण असून 4,53,165 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत.