हैदराबाद - दुष्परिणामांच्या संशयामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी तूर्त जगभरात थांबविण्यात येत असल्याचे अॅस्ट्राझेन्का कंपनीने बुधवारी जाहीर केले. त्यानंतर भारतात 'कोव्हीशिल्ड' नावाने ही लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटने याबाबत माहिती न दिल्याने औषध महानियंत्रकांनी ‘सीरम’ला नोटीस बजावली.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लसीच्या उत्पादनाबाबत सीरम इन्स्टिटय़ूटची अॅस्ट्राझेन्काशी (ब्रिटिश-स्वीडीश कंपनी) भागीदारी आहे. मानवी चाचणीत सहभागी झालेल्या एका व्यक्तीवर लसीचा दुष्परिणाम झाल्याचे आढळल्यानंतर अॅस्ट्राझेन्काने लसीच्या चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला. या लसीमुळे काय दुष्परिणाम झाले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, लसीची सुरक्षितता पडताळण्यासाठी तूर्त चाचण्या थांबविण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यात येत असताना एखाद्या व्यक्तीवर दुष्परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याची स्वतंत्र समितीद्वारे तपासणी करून सुरक्षेबाबतची खातरजमा करून घेण्यासाठी चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत. चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्यांची सुरक्षा आणि लसीच्या उच्च दर्जाबाबत कटिबद्ध असल्याचे अॅस्ट्राझेन्काच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
तमिळनाडू - एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) देशभरात सुरक्षित आणि कोविड मुक्त वातावरणासाठी प्रयत्न करीत आहे. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुन्हा सुरक्षित काम सुरू केले आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉकमुळे विमानतळावरून विमानांचे उड्डाण वाढले आहे. मात्र, विमानतळ प्राधिकरण संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. यासाठी टचलेस पॉईंट्स, हात धुण्याच्या जास्त जागा, निर्जंतुकीकरणाची सक्षम प्रणाली आणि इतर अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
पंजाब - राज्यात गुरुवारी ३८ फेसबुक, ४९ ट्वीटर आणि २१ यु-ट्यूब खात्यांवर पंजाब पोलिसांनी कारवाई केली. कोरोना लसीची संदर्भात चुकीची माहिती प्रकाशीत करण्याचा ठपका या खात्यांवर ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात १५१ फेसबुक, १०० ट्वीटर ४ इंस्ट्राग्राम आणि ३७ यु-ट्यूब खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात १२१ एफआयआर देखील दाखल करण्यात आल्या आहेत.