हैदराबाद - भारतात कोरोना रूग्णांची संख्या ४० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तीस लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत ही रूग्णसंख्या ४० लाखांवर गेली आहे. गेल्या २४ तासात ८६ हजार ४३२ रूग्णांची नोंद झाली असून एकूण ३१ लाख ७ हजार २२३ रूग्ण बरे झाले आहेत. लोकांचा बरे होण्याचा दर ७७.२३ टक्क्यांवर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
भारतात एकूण ४० लाख २३ हजार १७९ कोरोना रूग्ण असून एकूण मृत्यूंची संख्या ६९ हजार ५६१ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासात १०८९ जण या व्हायरसला बळी पडले आहेत. २१ दिवसांत भारतातील कोरोना प्रकरणे १० लाखांवरून २० लाखांवर गेली. तर, ३० लाखांचा टप्पा पार करण्यासाठी आणखी १६ दिवस लागले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले, की प्रथमच अधिक सोप्या पद्धतीसह, उच्च पातळीवरील चाचण्या सुनिश्चित करण्यासाठी अद्ययावत मार्गदर्शक सूचनांमध्ये 'ऑन-डिमांड' चाचणीची तरतूद करण्यात आली आहे.
ज्यांना चाचणी घेण्याची इच्छा आहे आणि जे देशांमध्ये किंवा राज्यांतून प्रवास करत आहेत त्यांना प्रवेशासाठी निगेटिव्ह चाचणीची आवश्यकता असल्यास 'ऑन डिमांड' चाचणी मिळू शकते. शिवाय, चाचणी सुलभ करण्यासाठी राज्य अधिकार्यांना अधिक स्वातंत्र्य आणि लवचिकता दिली आहे, असेही मंत्रालयाने सांगितले.
दिल्ली -
नवी दिल्ली - राजधानीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. शहरातील मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. पॉझिटिव्ह घटनांमध्ये वाढ केवळ चाचणीमुळे झाली आहे. दररोज सुमारे २० हजार ते ४० हजारापर्यंत चाचण्या होत आहेत. ४ सप्टेंबरला दिल्लीत ३६ हजार २१९ चाचण्या घेण्यात आल्या, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
तेलंगणा -
हैदराबाद - तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी शनिवारी ट्विटरवरून ही माहिती दिली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुतणे असलेले हरीश राव यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना स्वत: ला वेगळे ठेऊन कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.