हैदराबाद -देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ तासात देशभरात ६९ हजार ९२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६ लाख ९१ हजार १६६ एवढी झाली आहे. तर, २८ लाख ३९ हजार ८८२ लोक बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी लोकांची प्रकृती बरे होण्याचा दर ७६.९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर, मृतांची संख्या ६५ हजार २८८ झाली आहे.
कोरोनाव्हायरसला आळा घालण्यासाठी भारताने देशव्यापी लॉकडाउन लागू केल्यापासून आजचा १६२ वा दिवस आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात, गृह मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर राज्य सरकारांच्या संमतीने भारतीय रेल्वे आणखी विशेष गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे.
या पार्श्वभूमीवर, पाहूयात कोरोना संबंधी देशभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी..
नवी दिल्ली - दिल्लीतील कोरोना परिस्थितीचे सूक्ष्म-पातळीवर विश्लेषण करण्यासाठी मंगळवारी सर्व २७२ नगरपालिका प्रभागांना कव्हर करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. ही सेरोप्रिव्हलेन्स सर्वेक्षणाची ही पुढची फेरी असेल. यापूर्वी, सेरोप्रिव्हलेन्स सर्वेक्षण १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आले होते. यावेळी २९.१ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्याचे आढळून आले होते.