हैदराबाद : कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आज १५५ दिवस पूर्ण झाले. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ६१ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, ज्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३१,६७,३२३वर पोहोचली आहे. देशातील कोरोना चाचण्यांचा वेगही विलक्षणरीत्या वाढला आहे. १ ऑगस्टला हा वेग ३६३ चाचण्या प्रतिदशलक्ष प्रतिदिन असा होता; तोच आज ६०० चाचण्या प्रतिदशलक्ष प्रतिदिन असा आहे.
देशातील कोरोना आकडेवारी.. या पार्श्वभूमीवर पाहूयात कोरोनासंबंधीच्या देशभरातील विशेष घडामोडी..
नवी दिल्ली : एका सेरॉलॉजिकल सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे, की राजधानीमधील ५ ते १७ वर्षांच्या लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच या सर्वेक्षणात हेही समोर आले की शहरातील २९.१ टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.
मुंबई : राज्याच्या परभणी जिल्ह्यातील सुमारे १,६०० गणेश मंडळांनी यावर्षी गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगीलकर यांनी सांगितले.
तसेच, मंगळवारी राज्यातील ३५१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १४ हजार ६७वर पोहोचली आहे. तसेच, आतापर्यंत १४२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तिरुवअनंतपुरम :राज्यात आज २,३०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यांपैकी २,१४२ लोकांना दुसऱ्या रुग्णांच्या माध्यमातून कोरोना झाल्याचे समजले, तर १७४ रुग्णांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत माहिती मिळाली नाही. यांपैकी ६१ हे परदेशातून आले आहेत, तर ११८ हे इतर राज्यांमधून आले आहेत.
भुवनेश्वर :राज्य सरकारने मंगळवारी आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा चार प्रयोगशाळांमधील दर निश्चित केला. आता या प्रयोगशाळांमध्ये केवळ १,२०० रुपयांमध्ये ही चाचणी करता येणार आहे. तसेच कटक जिल्हा प्रशासनाने शहरामध्ये सार्वजनिक दुर्गापूजा करण्यास बंदी घातली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंगळुरू :राज्य काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले. त्यांच्यावर बंगळुरुच्या राजाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी ते उत्तर कर्नाटकमधील पूरग्रस्त भागाला भेट देणार होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला होता.
इम्फाळ : मणिपूरच्या समाज कल्याण मंत्री नेमचा किपगेन यांनी आपल्याला कोरोना झाल्याचे मंगळवारी फेसबुकवरून जाहीर केले. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.