हैदराबाद -भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३० लाखांच्या जवळ आला आहे. भारत कोरोना संसर्गामध्ये जगात आता तिसऱ्या स्थानी आला आहे. मात्र, इतर देशांशी तुलना करता भारतातील मृत्यू दर कमी आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत देशात २९ लाख ७५ हजार ७९४ कोरोनाचे एकूण रुग्ण झाले आहेत. तर ५५ हजार ७९४ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही ८ लाखांच्या जवळ आली आहे.
दिल्ली - जुलै महिन्यात दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली असतानाच शनिवारी पुन्हा १ हजार ४१२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ६० हजारांच्याही पुढे पोहचला आहे. तर ४ हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागील २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
झारखंड- झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य शीबू सोरेन आणि पत्नी रुपी सोरेन दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी ही माहिती दिली. शीबू सोरेन राज्याचे माजी मुख्यमंत्रीही होते. शुक्रवारी दोघांचेही घशातील स्वॉबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.