हैदराबाद - देशभरामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्याच्या घटनेला आता १५१ दिवस झाले आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत देशात २९ लाख १० हजार ३१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ५४ हजार ८४९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे संसर्ग झाल्यानंतर २१ लाख ५८ हजार ९४६ जण पूर्णतहा: बरे झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ७४.३० टक्के असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
दिल्ली -
राजधानी दिल्लीतील आठवडे बाजार २४ ते ३० ऑगस्ट दरम्यान प्रोयोगिक तत्वावर पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. दिल्ली आपत्ती निवारण विभागाने हा निर्णय घेतला आहे. कंटेन्मेट झोनच्या बाहेरील हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून जीम सुरू करण्यास अजूनही परवानगी नाही, असे प्रशासनाने सांगितले.
कर्नाटक -
कर्नाटकचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामल्लू यांच्या आईचे कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर बेल्लारी जिल्ह्यात निधन झाले.
मध्यप्रदेश -
मध्यप्रदेशातील सार्वजनिक बांधकाम मंत्री गोपाल भार्गव यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवरून त्यांनी संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. मध्यप्रदेशात शुक्रवारी दिवसभरात १ हजार १४७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५० हजाराच्या पुढे गेली आहे.
झारखंड -
धनबाद रेल्वे विभागातील कार्यालयात २७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर निर्जंतुकीकरणासाठी ३ दिवसांसाठी म्हणजेच रविवारपर्यंत कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. या तीन दिवसांत कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र -
राज्यात काल (शुक्रवार) ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के इतके आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण बरे झाले आहेत. काल १४ हजार १६१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या १ लाख ५६४ हजार ५६२ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ओडिशा -
सत्ताधारी बीजू जनता दल पक्षातील आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील एकूण ९ आमदारांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. भद्रक मतदारसंघातील आमदार संजीब मलिचक यांनी शुक्रवारी कोरोना झाल्याची माहिती दिली.
पश्चिम बंगाल -
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त उदय शंकर बॅनर्जी(५०) यांचा कोरोना संसर्ग झाल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत राज्यातील ९ पोलिसांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.
सिक्किम -
राज्याचे आरोग्य मंत्री एम. के. शर्मा यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुकवरून त्यांनी कोरोना बाधित असल्याची माहिती दिली.