हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांनी २६ लाखांचा आकडा पार केला आहे. तर संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्या २० लाखांच्या जवळ पोहचली आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देशात ६ लाख ७६ हजार ९०० आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा विचार करता अॅक्टिव्ह रुग्ण २५.५७ टक्के आहेत. बरे होणारे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्णांतील फरक दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढत आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ७२.५१ टक्के झाला असल्याचे हाती आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. देशभरात आत्तापर्यंत ५० हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात ७ लाखांपेक्षा जास्त जण दगावले आहेत.
विविध राज्यातील कोरोनाची स्थिती
उत्तर प्रदेश -
मागील २४ तासात राज्यात ४ हजार १८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत सर्वात जास्त रुग्ण लखनऊ शहरात सापडले आहेत. एकूण बाधितांचा आकडा १ लाख ४ हजार ८०८ झाला असून ५० हजार ८९३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
पंजाब -
राज्यामध्ये सोमवारी सर्वात जास्त १ हजार ४०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ३१ हजार ६९५ झाला आहे. यातील २० हजार १८० जण बरे झाले आहेत. सध्या राज्यात ११ हजार ६५३ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सरकारने जालंधर, लुधियाना आणि पटियाला शहरात पुढील आदेश काढेपर्यंत निर्बंध वाढविले आहेत. शहरी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे निर्बंध लादण्यात येत आहेत, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.
झारखंड -
झारखंड राज्यात सोमवारी ७३३ नवे रुग्ण आढळून आले. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २४ हजार ६७ झाला आहे. यातील १५ हजार ३४८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर २५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सद्यस्थिती ८ हजार ४६४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मध्यप्रदेश -
मध्यप्रदेशात सोमवारी ९३० नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ४६ हजार ३८५ झाला आहे. तर एकूण मृत्यू १ हजार १२८ झाले आहेत. ३५ हजार २५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून घरी गेले आहेत. अजूनही अॅक्टिव्ह रुग्ण १० हजार २३२ आहेत.
बिहार -
बिहार राज्यात मागील २४ तासांत २ हजार ५२५ नवे रुग्ण समोर आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ६ हजार ६१८ झाला आहे. तर आत्तापर्यंत ५३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीती राज्यात ३० हजार ९८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दिल्ली -
जुलै महिन्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केले. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती सुधारत असल्याचे दिसून येत आहे. राजधानी दिल्लीत मागील २४ तासांत ७८७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७४० जण बरे झाले आहेत. दिल्लीत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ५३ हजार ३६७ झाला असून यातील फक्त १० हजार ८५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्र -
देशाने 26 लाख कोविड रुग्णाचा टप्पा गाठला असताना महाराष्ट्रानेही आज (सोमवार) 6 लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आजतागायत २० हजार २६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज सोमवारी दिवसभरात ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, ८ हजार ४९३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे असून सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारपेक्षा आज (सोमवार) राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रातील पुणे शहरात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. सर्वात जास्त रुग्ण पुण्यामध्ये सापडत आहेत. आधी मुंबईमध्ये रुग्ण वेगाने वाढत होते. मात्र, आता पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.