हैदराबाद - देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता 17 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील चोवीस तासात देशात तब्बल 54 हजार 735 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, तब्बल 853 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात मागील 24 तासात कोरोनाचे 54 हजार 735 नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यांसह देशातील एकूण रुग्णसंख्या 17 लाख 80 हजार 268 वर पोहोचली आहे. तर, 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता 37 हजार 364 झाली आहे. तसेच देशात सध्या कोरोनाचे 5 लाख 67 हजार 730 सक्रीय रुग्ण असून आजपर्यंत तब्बल 11 लाख 45 हजार 629 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
देशात अनलॉक-3 सुरू होत आहे. परंतु, मागील 4 दिवसांमध्ये देशात सुमारे 2 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ही चिंतेची बाब आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे रविवारी कोरोनाचे 961 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यासह दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1 लाख 37 हजार 677 वर पोहोचली आहे. तसेच दिल्लीतील कोरोना मृतांची संख्या ही 4 हजार 4 इतकी आहे. रविवारी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चेन्नईतील अलवारपेट या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
देशातील अनेक राजकारणी देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडत असून रविवारी गृहमंत्री अमित शाहा यांसह कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाहूयात राज्यनिहाय कोरोनाचा आढावा...
महाराष्ट्र
- मुंबई - महाराष्ट्रात रविवारी 9 हजार 509 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 41 हजार 228 वर पोहोचली आहे. तर, 260 रुग्णाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. यासोबत मृत कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 576 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 76 हजार 809 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 537 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
पुणे जवळील चाकण एमआयडीसी येथील एका नामांकीत कंपनीतील 120 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे औद्योगिक वसाहत परिसरात खळबळ उडाली आहे. कंपनी आणि परिसर कंन्टेमेंट झोन करण्यात येऊन आरोग्य विभागाने कंपनी परिसरात शनिवारी (दि. 1 ऑगस्ट) रोजी येथील पाहणी केली आहे.