हैदराबाद - देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात ४७,७०३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४ लाख ८३ हजार १५७ वर पोहोचली आहे. तसेच देशात आजवर एकूण ३३ हजार ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद झाली आहे. सोमवारपर्यंत देशात एकूण कोरोनाचे ४ लाख ९६ हजार ९८८ सक्रीय रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच आतापर्यंत ९ लाख ५२ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कोरोनाला मात देण्यासाठी देशभरात कोरोना चाचण्यांची वाढ करण्यात भर देण्यात येत आहे. याच दरम्यान सोमवारी देशात तीन हाय कॅपॅसिटी असणाऱ्या तीन लॅबचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे सोमवारी नोएडा, मुंबई आणि कोलकाता स्थित लॅबचं उद्घाटन केलं. या लॅबच्या माध्यमातून सुमारे १० हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात.
जानेवारी महिन्यात देशात कोरोना टेस्टसाठी केवळ एक सेंटर होतं. मात्र, आज जवळपास १३०० प्रयोगशाळा संपूर्ण देशभरात कार्यरत आहेत. भारतात सध्या ५ लाखहून अधिक टेस्ट दर दिवशी होत आहेत. भारताने एका दिवसात पाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचा रेकॉर्ड केला आहे
पाहूयात राज्यनिहाय देशातील कोरोनाची परिस्थिती...
महाराष्ट्र
- मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. महाराष्ट्रात सोमवारी १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. तर, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे.
राज्यात सोमवारी ७ हजार ७१७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३ लाख ९१ हजार ४४० अशी झाली आहे. सोमवारी नवीन १० हजार ३३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २ लाख ३२ हजार २७७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण १ लाख ४४ हजार ६९४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.