हैदराबाद - देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता अधिक वेगाने वाढत असलेली दिसत आहे. दोन दिवसातच देशातील कोरोनारुग्णांचा आकडा 13 लाखाहून 14 लाखांच्या पार पोहोचला आहे. जगभरासह देशातील वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना इतक्यात यश येईस असे दिसत नाही. देशाचे पंधप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27 जुलै) रोजी देशातील मुंबई, नोएडा आणि कोलकाता या तीन प्रमुख शहरात आयसीएमआरच्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचे उद्घाटन केले.
देशभरात मागील 24 तासात तब्बल 49 हजार 931 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 708 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 453 वर पोहोचली आहे. यामध्ये 4 लाख 45 हजार 114 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.
आजवर 9 लाख 17 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, एकूण मृत्यू संख्या ही 32 हजार 771 इतकी झाली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असल्याने रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. तरीही एवढ्या वेगाने रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने सामान्य लोक चिंतेत पडले आहेत.
हेही वाचा -राज्यात प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा डिस्चार्ज रुग्णांची संख्या जास्त, ८ हजार ७०६ कोरोनामुक्त
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. त्यातून मृत्युदरही कमी करण्यात यश आले आहे. देशातील वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यात लवकरच यश येईल अशी आशा आहे. सध्या भारत हा जगातील क्रमांक तीनचा देश आहे, जिथे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.
पाहूयात कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..
महाराष्ट्र
- मुंबई - राज्यात सोमवारी प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली. सोमवारी 8 हजार 706 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर, 7 हजार 924 नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 21 हजार 944 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.84 टक्के आहे. सध्या 1 लाख 47 हजार 592 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सोमवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या 19 लाख 25 हजार 399 नमुन्यांपैकी 3 लाख 83 हजार 723 नमुने पॉझिटिव्ह (19.92 टक्के) आले आहेत. राज्यात 9 लाख 22 हजार 637 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 136 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सोमवारी 227 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.62 टक्के एवढा आहे.
दिल्ली
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये सोमवारी 613 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन महिन्यांमधील हा सर्वात कमी आकडा आहे. सध्या दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 31 हजार 219 वर पोहोचली आहे. दिल्लीतील कोरोना परिस्थिती सुधारत असून, दिल्लीच्या मॉडेलची चर्चा जगभरात होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.