हैदराबाद - भारतात दिवसेंगणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून देशात 45 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर, 750 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे. शनिवारी देखील देशात 48 हजार 916 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 13 लाख 36 हजार 861 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 757 कोरोना रुग्णांचा मृत्यू झला. त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 31 हजार 358 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 4 लाख 56 हजार 71 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर आजवर 8 लाख 49 हजार 431 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पाहूयात कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..
महाराष्ट्र
- मुंबई - महाराष्ट्रात जरी कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी राज्यात आज (शनिवार) सर्वाधिक 7 हजार 227 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून ते प्रमाण आता 56.55 टक्के झाले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 2 लाख 7 हजार 194 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी राज्यात महाराष्ट्रात कोरोनाचे 9 हजार 251 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची 3 लाख 66 हजार 368 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आजवर चाचण्यांसाठी पाठवण्यात आलेल्या 18 लाख 36 हजार 920 नमुन्यांपैकी 3 लाख 66 हजार 368 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला 8 लाख 64 हजार 509 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर, 44 हजार 603 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
हेही वाचा -CORONA UPDATE : महाराष्ट्रात ९ हजार २५१ नवे कोरोनाबाधित.. ७ हजार २२७ रुग्णांना डिस्चार्ज
मध्य प्रदेश
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झालेली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील कोरोनाची टेस्ट करावी, तसेच क्वारंटाईन व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवराज सिंह चौहान हे कोरोना पॉझिटिव्ह असलेले देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत.