हैदराबाद - देशात कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असले, तरी दररोज वाढणारी केरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात दररोज मोठ्या प्रमाणात नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तरीही, भारतात कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर हा इतर देशांपेक्षा जास्त, आणि मृत्यूदर हा इतरांपेक्षा कमी असणे, ही दिलासादायक बाब आहे. देशात लॉकडाऊन लागू होऊन आज १२१ दिवस झाले आहेत.
पाहूयात कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..
महाराष्ट्र
- मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या वर गेली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या, सुरक्षित राहा हे आवाहन सरकार, महापालिका प्रशासन यांच्यातर्फे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आज (गुरुवार) ९ हजार ८९५ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर आता ३.७ टक्के इतका झाला आहे. तर महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ६ हजार ४६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १ लाख ९४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रात गुरुवारी 9 हजार 895 नवीन कोरोना रुग्ण, 298 मृत्यू
राजस्थान
- जयपूर - राजस्थानच्या जोधपूरमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला प्रसिद्ध झालेले भिलवाडा मॉडेलही जोधपूरमधील रुग्णसंख्येवर आळा घालू शकले नाही. त्यामुळे आता स्थानिक प्रशासन, पुढारी आणि नेत्यांच्या मदतीने तिथे रामगंज मॉडेल राबवण्याचा विचार सरकार करत आहे.