हैदराबाद - मागील २४ तासांमध्ये देशभरात ३७,१४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच ५८७ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ११,५५,१९१ वर पोहोचली आहे. तसेच, बरे झालेल्यांची संख्या ७.२ लाखांवर, आणि उपचाराधिन रुग्णांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, देशभरात कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठी लोकांची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.
कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..
दिल्ली..
- नवी दिल्ली : जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीतील २३ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. राजधानीमधील ११ जिल्ह्यांमधून २० हजार लोकांचे सर्वेक्षण करुन हा अहवाल सादर करण्यात आला. कोरोनाची लागण झालेल्या लोकांपैकी बरेच लोक हे असिम्प्टोमॅटिक म्हणजेच कोणतीही लक्षणे न दिसणारे आढळले आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि दिल्ली सरकार यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण केले.
महाराष्ट्र..
- मुंबई : राज्यातील पुण्यामध्ये एका ३० वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला गृह-विलगीकरणात राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही ती मुंबईहून एका विशेष विमानाने दुबईला गेली होती. त्यामुळे विलगीकरणाचे नियम मोडल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..