हैदराबाद- भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 28 हजार 701 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. बाधितांची एकूण संख्या 8 लाख 78 हजार 254 इतक झाला आहे. मागील दहा दिवसांपासून बाधितांचा आकडा 22 हजारांचा टप्पा पार करत आहे. देशात सोमवारपर्यंत (13 जुलै) देशात 23 हजार 174 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- महाराष्ट्र -
कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस राज्यात वाढत असून राज्यात आज(सोमवार) ४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.
- नवी दिल्ली -
दिल्ली सरकारने सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित क्षेत्रातील कोरोनाचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्यात आदेश दिले आहेत. तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा उल्लेख यात करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. राजधानी दिल्लीतही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे.
- मध्य प्रदेश -
मध्य प्रदेशातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याअनुषंगाने राज्यात लॉकडाऊन 2 ची नवी नियमावली सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 2 लागू करण्यात आला आहे. यासाठी फक्त अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे सर्व व्यवहार, आस्थापने बंद राहणार आहेत.