हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,95,048 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 12,948 झाला आहे. तर आतापर्यंत 2,13,830 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दिल्ली
प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीला आता राष्ट्रीय राजधानीत कमीतकमी पाच दिवस क्वारंटाईन केंद्रामध्ये रहावे लागेल. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार हा आदेश जारी केला आहे. या निर्णयानंतर दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा एकदा समोरासमोर दिसले आहेत. यावर दिल्ली सरकारने आक्षेप घेतला आहे. क्वारंटाईनच्या भीतीने लोक कोरोना चाचणी करण्यास टाळतात असे दिल्ली सरकारचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र
महाराष्ट्र पोलिसांमध्ये गेल्या 48 तासांत 140 जणांना कोरोनाची लागण झाल आहे. तर एका पोलिसाचा मृत्यूही झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित एकूण पोलिसांचा आकडा 3,960 वर पोहोचला आहे. तर 2,925 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 31 जणांचा मृत्यृ झाला आहे.
दरम्यान, राज्यभरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. शनिवारी ३८७४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी १३६ रुग्ण मुंबईतील आहेत. सध्या राज्यात ५८ हजार ५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १३८० रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के एवढा आहे. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ५४ हजार नमुन्यांपैकी १ लाख २८ हजार २०५ नमुने पॉझिटिव्ह (१७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ९४ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कर्नाटक
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार, आता ज्या प्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हे असेच वाढत राहीले तर येत्या 15 ऑगस्टपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर जाईल. हा अंदाज आताच्या रुग्ण दुप्पट होण्याच्या दरावर आधारित आहे. मात्र, जर सध्याच्या परिस्थितीत काही सुधारणा झाली तर, रुग्णांचा आकडा 50 ते 60 हजारांवर जाईल, असा अंदाज आहे.