हैदराबाद -एका अदृश्य शत्रूबरोबरचा जगाचा लढा कायम आहे. आजपर्यंत, संपूर्ण जगभरात महामारीने 10 लाख लोकांचा बळी घेतला असून रुग्णसंख्या3.5 कोटीवर गेली आहे. भारतात आतापर्यंत 66 लाख प्रकरणे असून 1 लाख मृत्यूची नोंद झाली आहे. अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना अलर्ट करत आगामी सणासुदीच्या काळात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे भारतात, सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने लोक एकत्रित येतात आणि सामुदायिक पातळीवर उत्सव साजरे करतात. परंतु कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर, शारीरिक अंतर राखणे हे एक न्यू नॉर्मल बनले आहे. त्यामुळे, सध्याच्या परिस्थिती उत्सव साजरे करण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. २०२० मधील ओणमचा उत्सव साजरा करण्यासाठी जगभरातील केरळवासीय आपल्या घरी परतले. दुर्दैवाने, या उत्सवाच्या काळात कोरोनाव्हायरसच्या घटनांमध्येही वाढ दिसून आली. महामारीच्या काळात आवश्यक प्रोटोकॉलमध्ये दुर्लक्ष झाल्याने मलप्पुरम, इडुक्की, कोल्लम आणि पठाणमथिट्टामधील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
परिणामी, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यभर कलम 144 लागू करावे लागले. पश्चिम बंगालमध्येही देखील दुर्गा पूजा उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक एकत्रित येत असल्याने आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच नवरात्रीदरम्यान गरबा आणि दांडिया खेळण्याला बंदी घातली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणा सरकार देखील खबरदारीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करीत आहेत. लोकांनी देखील तितक्याच सतर्कतेने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि संपूर्ण बथुकम्मा, दसरा आणि दीपावली उत्सवांमध्ये खबरदारीच्या उपायांचे स्वेच्छेने पालन केले पाहिजे.