नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला असतानाच संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबरपासून (सोमवार) सुरू होत आहे. मात्र, यावेळी कोविड नियमावलीचे पालन करत अधिवेशन भरणार आहे. सर्व खासदार आपली हजेरी मोबाईल अॅपच्या माध्यमातून देणार आहेत. यासाठी हजेरी नोंदणी अॅप तयार करण्यात आले आहे.
सभागृहातील सर्व सदस्यांना कोरोना नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. सदस्यांना बसण्यासाठी ठराविक अंतर ठेवून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काचेच्या लहान केबिनची निर्मिती करण्यात आली आहे. हजेरीसाठी नॅशनल इन्फॉरमॅटिक्स सेंटरने अॅप तयार केले आहे.
हजेरीचे हे अॅप फक्त संसद परिसरात काम करु शकते, अशा पद्धतीने बनविण्यात आले आहे. चेहऱ्याचा फोटो काढून अॅपमध्ये अपलोड केल्यानंतर प्रत्येक खासदाराची हजेरीची नोंद होणार आहे. या अॅपमध्ये हजेरी सोबतच, पूर्ण आणि अर्ध्या दिवसाची सुटी, अहवाल, रजा अर्ज या सुविधाही खासदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
संसद सचिवालयातील कर्मचाऱ्यांनाही याच अॅपचा वापर करावा लागणार आहे. १४ सप्टेंबरपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशन काळात एकही सुटी असणार नाही. लोकसभा आणि राज्यसभा सभागृहात प्रत्येकी चार तास कामकाज चालणार आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी सकाळी ९ ते १ पर्यंत लोकसभेचे कामकाज चालणार आहे. तर ३ ते ७ पर्यंत राज्यसभचे काम चालणार आहे. मात्र, दुसऱ्या दिवशीपासून नियमितपणे राज्यसभेचे सकाळी ९ ते १ यावेळात आणि लोकसभेचे ३ ते ७ या वेळात कामकाज चालणार आहे.