महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 LIVE : कोलकातामध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, देशातील रुग्णांची संख्या १४२ वर... - कोरोना लाईव्ह अपडेट

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात १,८४,०००हून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सात हजारांहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ८० हजार लोक यातून बरेही झाले आहेत. कोरोना विषाणूसंबंधीच्या सर्व ताज्या बातम्या पहा एका क्लिकवर...

Covid-19 live updates
COVID-19 LIVE : वाचा कोरोनासंबंधीच्या सर्व बातम्या एका क्लिकवर..

By

Published : Mar 17, 2020, 4:42 PM IST

Updated : Mar 17, 2020, 10:11 PM IST

  • कोलकातामध्ये आढळला नवा रुग्ण, देशातील रुग्णांची संख्या १४२ वर..

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. १८ वर्षांचा हा तरुण इंग्लंडहून भारतात परतला होता. यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या १४२ वर पोहोचली आहे.

  • वुहानमध्ये गेल्या २४ तासांत आढळला एकच नवा रुग्ण..

बीजींग - चीनच्या वुहानमध्ये, जिथे या कोरोना विषाणूचा उगम झाला तिथे गेल्या २४ तासांमध्ये केवळ एक नवा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे चीन सरकारने वुहानमध्ये पाठवलेल्या सर्व जादाच्या डॉक्टरांना बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे.

  • महाराष्ट्रातील सरकारी कार्यालये, मुंबईमधील सार्वजनिक वाहतूकही सुरू राहणार..

मुंबई - राज्यातील सरकारी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार असून, मुंबईमधील सार्वजनिक वाहतूकही सुरू राहणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे. लोकांनी स्वतःहून अनावश्यक प्रवास टाळला नाही, तर मात्र रेल्वे आणि बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

  • पुणे-मुंबईत आढळले नवे रुग्ण..

मुंबई - पुणे शहरात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. यासोबतच, मुंबईमध्येही कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४१ वर पोहोचली आहे.

  • रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट महागले..

नवी दिल्ली -रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ केली आहे. याआधी दहा रुपयांना मिळणारे प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपयांना मिळणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर याठिकाणच्या २५० प्लॅटफॉर्म्सवर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. यासोबतच, मध्य रेल्वेनेही सोलापूर, पुणे, मुंबई आणि भुसावळ या स्थानकांवर ही दरवाढ लागू केली आहे.

  • पुण्यातील हॉटेल आणि बार तीन दिवस बंद..

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील सर्व हॉटेल आणि बार पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनने स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २० मार्चपर्यंत शहरातील हॉटेल्स बंद राहतील.

  • साईबाबा मंदिराचे दरवाजे बंद..

अहमदनगर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डीचे साईबाबा मंदिर बंद करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाने आज हा निर्णय घेतला. अनिश्चित काळासाठी ही बंदी लागू करण्यात आली आहे.

  • तामिळनाडूमध्ये आढळला नवा रुग्ण..

चेन्नई -तामिळनाडूमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. अबुधाबीवरून आलेल्या एका ६४ वर्षाच्या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेतही याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. जगभरात १,८४,०००हून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सात हजारांहून अधिक लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ८० हजार लोक यातून बरेही झाले आहेत.

भारतात आतापर्यंत सुमारे १३० जणांना याची लागण झाली असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहाहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Mar 17, 2020, 10:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details