COVID-19 LIVE :
- देशात कोरोना रुग्णाचा आकडा 114 वर, तर राज्यात 39
नवी दिल्ली -ओडिशा, जम्मू काश्मीर, लडाख, आणि केरळमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 114 वर पोहचली आहे. यापैकी 14 जण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.
- केरळमध्ये कोरोना रुग्णाचा आकडा 24 वर
केरळमध्ये आणखी 3 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण आकडा 24 वर गेला आहे.
- महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 39
महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 39 वर पोहोचली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
- महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद, तर कोरोनाचे निवडणुकांवरही सावट
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सूचना कुलगुरु आणि संबंधित विभागांना देण्यात आली आहे.
- त्रिपूरा राज्यात शाळा, विद्यापीठ 17 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद
नवी दिल्ली -कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता त्रिपूरा सरकारने राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठ, सिनेमागृह आणि व्यायमशाळा 17 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- बिहार विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
नवी दिल्ली -देशामध्ये कोरोनाच्या रुग्णाची वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बिहार सरकारने विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे.
- राज्यात आढळले पाच नवे रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३८..
मुंबई - राज्यात कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३८वर पोहोचली आहे. यांपैकी तीन रुग्ण मुंबई, एक नवी मुंबई, तर एक यवतमाळमध्ये आढळून आला आहे.
- आसाममधील सर्व राष्ट्रीय उद्याने बंद..
गुवाहाटी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आसाममधील सर्व राष्ट्रीय उद्याने बंद करण्यात येणार आहेत. १७ मार्च ते २९ मार्चपर्यंत राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्प बंद राहणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.
- पुण्यात आढळला नवा रुग्ण, राज्यात एकूण ३३ कोरोनाग्रस्त..
पुणे - पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा नवा रुग्ण आढळून आला आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ वर पोहोचली आहे.
- ओडिशामध्ये आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण..
भुवनेश्वर - ओडिशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. हा तरुण इटलीहून परतला होता, अशी माहिती मिळत आहे. यानंतर देशातील रुग्णांची संख्या १११ झाली आहे.
- सोमवारी शेअर बाजार पुन्हा गडगडला..
कोरोना विषाणूचा शेअर बाजारावरील प्रभाव सोमवारीही सुरू राहिला आहे. आज सकाळीच शेअर बाजार उघडताना सेन्सेक्स १६०९.५२ अंशांनी घसरून ३२,४९३.९६ वर स्थिरावला. तर, निफ्टी ४९५.७५ अंशांनी घसरून ९,४५९.४५ वर स्थिरावला.
- बिहारमधील कोरोना संशयित फरार..
पाटणा - बिहारच्या दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून रविवारी एक कोरोना संशयित फरार झाला. सामान्य कक्षातून कोरोनासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कक्षात नेत असताना हा रुग्ण पळून गेला, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजीव रंजन यांनी दिली.
- कोल्हापुरात कोरोना संशयिताचा मृत्यू..
कोल्हापूर - कोल्हापूरातील एका ६८ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा काल (रविवार) मृत्यू झाला. हरियाणा- दिल्ली मुंबई पुणे असा प्रवास करत ते कोल्हापूरात आले होते. या रुग्णाच्या घशाचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले असून, आज (सोमवार) सायंकाळपर्यंत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहेत. ८ मार्च रोजी कोल्हापूरहून दिल्लीमार्गे हरियाणा असा प्रवास करून पुन्हा 12 मार्च रोजी ते कोल्हापूरात परत आले होते. या रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळल्याने रविवारी सकाळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) कोरोना विशेष कक्षात दाखल केले होते. शिवाय श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
- इराणमधील भारतीयांची चौथी बॅच मायदेशी परत..
नवी दिल्ली - इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. आज ५३ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले. यामध्ये ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. इराणमधील तेहरान आणि शिराझ या शहरांमधील हे विद्यार्थी होते. आतापर्यंत इराणमधील एकूण ३८९ भारतीयांना परत आणण्यात परराष्ट्र मंत्रालयाला यश आले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेतही याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. जगभरात कालपर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सुमारे साडेसहा हजार लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ७७ हजार लोक यातून बरेही झाले आहेत.
भारतात आतापर्यंत सुमारे ११० जणांना याची लागण झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहाहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.